हिंगोली चषक २०२७ अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण!आमदार संतोषदादा बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा उत्साहात; २७ व २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा हिंगोलीत जमणार मेळामहाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

हिंगोली चषक २०२७ अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण!

आमदार संतोषदादा बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा उत्साहात; २७ व २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा हिंगोलीत जमणार मेळा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
13 नंबर 2026 

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत असलेल्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धा – हिंगोली चषक २०२७ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या लोगो अनावरण सोहळ्यामुळे हिंगोलीच्या क्रीडा क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, बॅडमिंटनप्रेमी आणि खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषदादा बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवाजीराव मुटकुळे, दिलीप चव्हाण, अभियंता अशोक अग्रवाल, जगजित खुराना, सुरेश सराफ, सुनील देवडा, मनोज आखरे, जितसिंग साहू आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले.

हिंगोलीच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश

हिंगोली जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी, स्थानिक खेळाडूंना देशातील नामवंत खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी, तसेच जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड, शिस्त आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, या व्यापक उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाचे आमदार संतोषदादा बांगर यांनी विशेष कौतुक केले. हिंगोलीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करणे ही अभिमानाची बाब असून, अशा स्पर्धांमुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच हिंगोलीच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

२७ व २८ फेब्रुवारीला रंगणार हिंगोली चषक २०२७

या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन २७ व २८ फेब्रुवारी २०२७ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेत विविध गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून, विजेत्या खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. देशाच्या विविध भागांतील नामवंत बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय क्रीडा नकाशावर हिंगोलीची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा संकल्प

हिंगोली चषक २०२७ ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाच्या विकासासाठी आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हिंगोलीची राष्ट्रीय क्रीडा नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा आयोजकांचा संकल्प आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातील नव्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता अशोक अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन श्री. दीपक नयनवाणी यांनी केले, तर श्री. सुमित भैय्या चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हिंगोलीतील सर्व बॅडमिंटन खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. लोगो अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने हिंगोलीच्या क्रीडा क्षेत्रात नव्या उत्साहाची लाट निर्माण झाली असून, फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने