आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
ॲड. विष्णू मुरकुटे यांच्या प्रभावी युक्तिवादाला यश; तीन आरोपींपैकी दोघांना दिलासा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
06 नोव्हेंबर 2026
हिंगोली : आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्ह्यात तीन आरोपींपैकी दोन आरोपींना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपींच्या वतीने ॲड. विष्णू मुरकुटे यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याने दोघांना अटकपूर्व जामिनाच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हिवरा फाटा येथे संबंधित आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एकूण तीन आरोपींविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यात अटकेची शक्यता लक्षात घेता आरोपींच्या वतीने ॲड. विष्णू मुरकुटे यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणीदरम्यान ॲड. विष्णू मुरकुटे यांनी आरोपींच्या बाजूने कायदेशीर बाबी मांडत प्रभावी युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तीन आरोपींपैकी दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या प्रकरणात ॲड. महेश आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ॲड. बद्रीनाथ टेकाळे, ॲड. विक्रम राजे शिंदे, ॲड. रमेश धात्रक, ॲड. हनुमान वामन, ॲड. रवी जाधव आणि ॲड. स्वप्नील इंगळे यांनी सहकार्य केले.
या प्रकरणातील दोन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने संबंधित कायदेशीर प्रक्रियेत आरोपींच्या बाजूने महत्त्वपूर्ण यश मिळाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा