बासंबा पोलिसांची वानखेडे बार व लॉजिंगवर धाड; वेश्याव्यवसायाचा प्रकार उघड
तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा आरोप; लॉजिंग चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
07 नोव्हेंबर 2026
हिंगोली : हिंगोली ते वाशिम राज्य महामार्ग क्रमांक १६१ लगत अंबाळा शिवारातील न्यू वानखेडे बार व लॉजिंग येथे बासंबा पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला. लॉजिंग चालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा आरोप असून, याप्रकरणी बालाजी तुकाराम वानखेडे (वय ४८, रा. कनेरगाव नाका, ता. जि. हिंगोली) याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास अंबाळा शिवारातील न्यू वानखेडे बार व लॉजिंग येथे हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी लॉजिंगचा चालक बालाजी वानखेडे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिला (वय ३८, रा. उमरी, जि. नांदेड, सध्या जटाळवाडी, ता. कळमनुरी), पांडे (वय २७, रा. पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला) आणि धंदर (वय ३३, रा. चांदूर बाजार, जि. अमरावती) या तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८५/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी माधव गणपत भडके यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद पोले यांनी पूर्ण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास आडे करीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा