आरोग्य अधिकारी जायभाये ॲक्शन मोडवर! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यालयात अचानक धडक; प्रलंबित फायली तातडीने निकाली काढण्याचे आदेशकामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानतेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती; गैरहजेरी व उशिरा येणाऱ्यांना खुलासा सादर करण्याच्या सूचना

आरोग्य अधिकारी जायभाये ॲक्शन मोडवर! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यालयात अचानक धडक; प्रलंबित फायली तातडीने निकाली काढण्याचे आदेश

कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानतेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती; गैरहजेरी व उशिरा येणाऱ्यांना खुलासा सादर करण्याच्या सूचना

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २६ नोव्हेंबर : जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा आरोग्य कार्यालयाला अचानक भेट देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. या अचानक पाहणीमुळे कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली. कार्यालयीन उपस्थितीपासून ते विविध विभागांतील प्रलंबित कामकाजापर्यंत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
कार्यालयात दाखल होताच डॉ. जायभाये यांनी सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली. शासकीय कार्यालयात निर्धारित वेळेत उपस्थित राहणे ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची जबाबदारी असून, नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी कार्यालयीन शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासणीदरम्यान अनुपस्थित आढळलेल्या तसेच उशिरा कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांकडून खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रलंबित फायलींवर विशेष लक्ष
या पाहणीदरम्यान जिल्हा आरोग्य कार्यालयातील विविध प्रशासकीय शाखा आणि आरोग्यविषयक विभागांच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. विविध योजनांशी संबंधित प्रस्ताव, प्रशासकीय मान्यता, पत्रव्यवहार आणि इतर प्रलंबित फायलींची सद्यस्थिती तपासण्यात आली. अनेक प्रकरणे अनावश्यकपणे प्रलंबित राहू नयेत, यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी प्राधान्याने कार्यवाही करून फायलींचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश डॉ. जायभाये यांनी दिले.

कामकाजात पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश

कार्यालयीन कामकाज करताना कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित ठेवू नये. प्रत्येक कामाची जबाबदारी निश्चित करून वेळेत काम पूर्ण करावे. नागरिकांची कामे प्राधान्याने मार्गी लावावीत तसेच प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे कामकाज अधिक प्रभावी होण्यासाठी जिल्हा आरोग्य कार्यालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि गतिमान असणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान ठेवून जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या या अचानक पाहणीमुळे आरोग्य विभागातील प्रशासकीय कामकाजावर लक्ष केंद्रित झाले असून, यापुढेही कार्यालयीन शिस्त, नियमित उपस्थिती आणि प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याबाबत कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत या भेटीतून मिळाले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने