कारवाडी येथील रमाई महिला मंडळाचे उपोषण
हिंगोली, - तालुक्यातील कारवाडी येथील बौध्द विहार ओट्याच्या बाजुस ग्रामपंचायतच्या मालकी जागेवर समाज मंदीराचे बांधकाम करावे या मागणीसाठी रमाई महिला मंडळाने कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सोमवारी उपोषण सुरू केले आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,समाज मंदीरासाठी पाच लाखाचे अनुदान आमदार स्थानिक निधी अंतर्गत मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी कार्यालय यांना सरपंच , ग्रामसेवक , ग्रामपंचायत कार्यालय कारवाडी यांनी ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेचे समाज मंदीर बांधण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. गंगानगरातील काही लोकांनी येथे समाज मंदीर होऊ नये म्हणून खोटया तक्रारी दिल्या आहेत पण त्यांचा ग्रामपंचायतच्या जागेवर काही संबंध नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच या संदर्भात संबंधित अभियंता यांनी पाहणी देखील केली आहे. कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत काहीच तथ्य आढळून आले नाही .
बौध्द विहाराच्या ओटयाच्या बाजुला व मागे पुढे भरपूर मोकळी जागा आहे. मात्र एक दिड महिना कोणत्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही व दखल घेतलेली नाही. या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणास बसत असल्याचे समजल्याने सरपंच , ग्रामसेवक ग्रामपंचायत हयांना पत्र देऊन जायमोक्यावर उपस्थित राहून प्रस्थापित जागा दाखवावी जेणे करुन समाज मंदीर बांधकामाचे मार्क आऊट देऊन काम सुरु करता येईल असे लेखीपत्र ग्रामपंचायतला दिले व उपोषण मागे घेण्यात यावे असे कळविले होते. त्यामुळे उपोषण तात्पुरते मागे घेतले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नसल्याने हे उपोषण सुरू केले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर मंडळाच्या अध्यक्षा ज्य़ोतीमाला धवसे, माला भगत, निलावती कदम, रमाबाई खिल्लारे, अंकिता भालेराव, आशा खंदारे, मंगल खंदारे, ताईबाई खंदारे, आशा इंगोले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा