व्यापारी महासंघाच्या बंदला प्रचंड प्रतिसाद : चोऱ्यांच्या घटनांचा छडा लावण्याची मागणी : हिंगोली ते मुबंई रेल्वे सुरू करा या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना शिष्टमंडळ लवकरच भेटणार
हिंगोली /-
हिंगोली शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून या घटनांचा छडा लाऊन आरोपींनी अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी व्यापारी महासंघाने शुक्रवारी दि. ७ पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाणे बंद होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना हिंगोली ते मुबंई रेल्वे सुरू करण्यासाठी जालना येथे शिष्टमंडळ भेटणार आहे.
हिंगोली शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. दिवसाढवळया घरात प्रवेश करून चोरटे लाखोचा ऐवज लंपास करू लागले आहेत. या शिवाय दुकाने फोडून दुकानातील रक्कम व साहित्य चोरीला जात आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. या चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिस दफ्तरी गुन्हा दाखल होत असून चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिस यंत्रणा मात्र अपयशी ठरत आहे.
शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांना आवर घालण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघाने आज शुक्रवारी हिंगोली बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार या बंदमध्ये हॉटेल्स पासून ते मोठी व्यापारी प्रतिष्ठाणे या बंदमध्ये सहभागी झाली होती. आज सकाळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, व्यापारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी, बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, सुमीत चौधरी, पंकज अग्रवाल, राजेश अग्रवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरात फेरी मारून बंदचे आवाहन केले. विशेष म्हणजे भाजी विक्रेते देखील या बंदमध्ये सहभागी झाले होते. आजच्या बंदमुळे शहरातील गजबजणाऱ्या रस्त्यांवर देखील शुकशुकाट निर्माण झाला होता. दरम्यान आमदार तान्हाजी मुटकूळे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोन वरून हिंगोली ते मुबंई रेल्वे सुरू करण्यासाठी संभाषण केले. तसेच रेल्वे सुरू करण्यासाठी जालना येथे शिष्टमंडळ रावसाहेब दानवे यांना भेटणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा