घरगुती कारणावरुन पत्नीचा खुन करणार्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
महाराष्ट्र 24न्यूज
हिंगोली
शहरातील नगरपरिषद कॉलनी येथे घरगुती कारणावरून स्वतःच्या पत्नीस धारधार शस्त्राने खून केल्याप्रकरणी शनिवार दि.५ मार्च रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.
शहरातील नगरपरिषद कॉलनी येथील आरोपी शेख सलीम शेख इस्माईल (५८) याने दि.२७ मे २०१७ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून पत्नी परवीन बेगम सोबत वाद करून डोक्यावर, गळ्यावर, फासळीवर धारधार खंजीराने मारून निर्घुण खून केला होता. या आशयाची फिर्याद आरोपी व मयत पत्नीच्या मुलाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गु.र.न.२३१/२०१७ कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासीक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक डी.टी. मूलगीर यांनी गुन्ह्याचा तपास लावून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदरचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी.पालदेवार यांच्या समोर सुनावणी सुरु होती. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सविता एस. देशमुख यांनी १८ साक्षीदार तपासले असता फिर्यादी व इतर साक्षीदाराचा पुरावा व परिस्थिती जन्य पुरावा तसेच आरोपीचे अतिरिक्त न्यायालयीन कबुली जबाब ग्राह्य धरून दि.५ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी.पालदेवार यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी शेख सलीम इस्माईल (वय ६३) यास कलम ३०२ भादवी नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदरच्या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती सविता एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी.कुटे, एन.एस.मुटकुळे, ऍड.जी.व्ही.घुगे यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक टी.एस.गोहाडे, ज्योती खिल्लारे . एस.बी.गायकवाड यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा