मुलांना रस्त्यावर थांबवुन शिक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या



मुलांना रस्त्यावर थांबवुन शिक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली  
 तालुक्यातील पिंपळदरी शिवारामध्ये दोन मुलांना रस्त्यात दुचाकीवर थांबवून शिक्षकाने बाजूला जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.२६ मे रोजी दुपारी उघडकीस आली आहे. लोडबा रामा गायकवाड (३७) रा. गाडी बोरी, ता. हिंगोली असे या शिक्षकाचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोडबा गायकवाड हे जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे ते त्यांच्या मूळ गावी गाडीबोरी येथे आले होते. गायकवाड हे आज सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर दोन मुलांना बसवून भटसावंगी येथे सासरवाडीला सोडण्यासाठी निघाले होते. रस्त्यामध्ये पिंपळदरी शिवारात दुचाकी वाहन थांबवून त्यांनी दोन्ही मुलांना वाहनावर थांबण्यास सांगितले. त्यामुळे मुले वाहनावर बसून होती. त्यानंतर गायकवाड यांनी बाजूला पिंपळदरी शिवारात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान बराच वेळ होऊन वडील परत आले नसल्यामुळे मुले रडू लागली. सदर प्रकार रस्त्याने जाणार्‍या काही शेतकर्‍यांनी पाहिला त्यांनी मुलांकडे विचारणा केली असता मुलांनी त्यांचे वडील लघुशंकेला गेल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकर्‍यांनी परिसरात जाऊन पाहणी केली असता लोडबा गायकवाड यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश, भोसले जमादार नाना पोले, काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृत गायकवाड यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अद्यापपर्यंत बासंबा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने