वसमत येथे सापडले चार महिन्यांचे मृत अर्भक; दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू: अवैध गर्भपात करणारा डाॅक्टर कोण...?
वसमत
येथील सम्राट कॉलनी भागात गुरुवार दि.१६ जून रोजी दुपारी एका नालीमध्ये चार महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली. अखेर मृत अर्भक प्रकरणी दोन महिलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे. मृत अर्भक हे अनैतिक संबंधातून गर्भ राहिल्याने अवैध गर्भपात करणारा डाॅक्टर कोण या बद्दल वसमत शहरात प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील सम्राट कॉलनी भागात एका नालीमध्ये पिशवीत बांधलेले एक अर्भक आढळून आले. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार शेख नय्यर, भगीरथ सवंडकर, पोले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भक ताब्यात घेऊन वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अर्भक स्त्री जातीचे किंवा पुरुष जातीचे आहे याची शाहनिशा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. यामध्ये दोन महिलांनी सदर पिशवी नालीमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यात एक महिला त्या अर्भकाची आई असून सदरील अविवाहित महिला आहे. दुसरी महिला त्या महिलेची आई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असून दोन महिलावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. संबंधित अवैध गर्भपात करणारा डाॅक्टर कोण या संदर्भात पोलिस शोध घेत आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा