हिंगोली जिल्हा प्रशासनाची तिरंगा राईड ठरली ऐतिहासिक
* 175 सायकल स्वारांनी नोंदवला सक्रिय सहभाग
* ठिकठिकाणी राष्ट्र भक्तीच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी दिला प्रोत्साहन
हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त रविवार 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली 75 किमी तिरंगा राईड ऐतिहासिक ठरली आहे. सदरील तिरंगा राईडमध्ये 175 सायकल स्वारांनी सक्रिय सहभाग नोंदवून भारत माता की जय याचा जयघोष केल्याने राष्ट्र भक्तीचे वातावरणात निर्माण झाले होते. तर विद्यार्थ्यांनी सहभागी सायकल स्वरांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून प्रोत्साहन दिला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती घडवून आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संत नामदेव पोलीस कवायत मैदान-नर्सी नामदेव-सेनगाव-कोळसा या दरम्यान भारतीय ध्वजासोबत 75 किमी तिरंगा सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते.
या जनजागृती रॅलीत अहमदनगर, औरंगाबाद, वाशीम, परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेनगाव, वसमत, कळमनुरी, सेलू आणि हिंगोली येथील सुमारे 175 सायकल स्वारांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तिरंगा टीशर्ट परिधान करून सायकल स्वारांनी भारत माता की जयचा जयघोष केल्याने शहरासह परिसरात राष्ट्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंध राईड दरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून सायकल स्वरांचा उत्साह वाढवला होता.
रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, तहसीलदार नवनाथ वगवाड, तहसीलदार जीवककुमार कांबळे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल आदींनी हिरवी झेंडी दाखवून केली. 75 किमी पूर्ण करणाऱ्या सर्व सायकल स्वरांचा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या कार्यालयाच्या वतीने पदक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. राईडच्या यशस्वीतेसाठी गणेश शिंदे, बबन व्यवहारे, रवी इंगोले, सुनील मरळे, प्रवीण काळबांडे, प्रशांत बोरसे आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा