एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दिग्रस गावावर शोककळा पसरली

उपचारांसाठी नेताना दुचाकीला अपघात; आजारी वडिलांसह आई-मुलाचाही मृत्यू
हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी गावावर पसरली शोककळा

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
11 जानेवारी 2024
हिंगोली : वडिलांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना सिरसम बु. ते डिग्रसवाणी रस्त्यावरील एका वळणावर दुचाकीला १० जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील वडील, मुलगा आणि आई या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे डिग्रसवाणी गावावर शोककळा पसरली आहे. मृतात कुंडलिक श्रीपती जाधव (वय ७०), कलाबाई श्रीपती जाधव (वय ६०) व आकाश कुंडलिक जाधव (वय २७, तिघेही रा. डिग्रसवाणी) यांचा समावेश आहे.
हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथील कुंडलिक जाधव यांना ताप आल्यामुळे अशक्तपणा जाणवत होता. गावात उपचारांची सुविधा नसल्यामुळे १० जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेदरम्यान त्यांना एमएच २० एझेड ५७१७ या दुचाकीवरून पत्नी कलाबाई व त्यांचा मुलगा आकाश डिग्रसवाणी येथून चार कि.मी. अंतरावर असलेल्या सिरसम बु. येथील रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन निघाले होते. आकाश दुचाकी चालवत होता. गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर असलेल्या वळणावर दुचाकीवरील ताबा सुटला आणि तिघेही दुचाकीसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या आठ ते दहा फूट खोल नालीत कोसळले. त्याठिकाणी असलेल्या दगडावर डोके आदळल्यामुळे तिघांनाही गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले.

दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी कुटुंबीयांनी आकाश जाधव याच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल बंद असल्याने संपर्क होत नव्हता. त्यानंतर आकाशचा भाऊ सिरसम बु. येथे शोध घेण्यासाठी निघाला असता रस्त्यावरील वळणावर ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती डिग्रसवाणी येथे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याठिकाणी ग्रामस्थांची गर्दी जमली होती. बासंबा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृतदेहावर डिग्रसवाणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जाधव कुटुंबातील तिघांना काळाने गाठल्याने डिग्रसवाणी गावावर शोककळा पसरली आहे. मयत आकाश अविवाहित होता. कुंडलिक व कलाबाई जाधव यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.

Post a Comment

أحدث أقدم