गुणवत्तेत बालरोग विभाग हिंगोली राज्यात पहिला
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
24जुलै2024
हिंगोली : भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र अंतर्गत केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या परीक्षणामध्ये हिंगोली येथील बालरोग विभागास राज्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार या विभागाला जाहीर झाला आहे.
नॅशनल क्वालिटी अशोरन्स अंतर्गत एक हजारांपेक्षा अधिक घटकांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यात हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागाला ९१.५ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे या विभागास मुस्कान कार्यक्रमांतर्गत प्लॅटिनम पुरस्कार जाहीर झाला आहे. या मूल्यमापनात बाह्य रुग्ण विभागास ९२.६३. टक्के, अंतर रुग्ण विभागाला ८८.०८ टक्के, पोषण पुनर्वसन केंद्राला
९३.६४ टक्के, विशेष नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला ११.६७ टक्के गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल आरोग्य आयुक्त अमगोथू श्रीरंगा नाईक, आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही मंगळवारी आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, बालरोग विभागप्रमुख डॉ. गोपाल कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. मनीष मुपकलवार, डॉ. विशाल पवार, डॉ. नागेश बांगर, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. स्वप्नील गिरी, डॉ. शंकर पोले, डॉ. अमोल देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता अग्रवाल, डॉ. मृणाल कवर्ती आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा