हिंगोलीत जिल्ह्यात तीन महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या

 हिंगोलीत जिल्ह्यात तीन महिन्यात १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
3 एप्रिल 20245
हिंगोली: कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी आणि त्यामुळे पिकांचे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. या संकटाला तोंड देताना शेतकरी आत्महत्या करण्यास मजबूर होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रत्येकी पाच-पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर मार्च महिन्यात ही संख्या वाढून सहा झाली आहे.
शेतीसाठी लागणारे बियाणे आणि खत खरेदी करण्यासाठी शेतकरी पीक कर्ज घेतो किंवा खासगी सावकारांकडून पैसे उधार घेतो. मात्र, वेळेवर पाऊस न पडणे किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढतो. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या वर्षातील केवळ तीन महिन्यांत १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने ही बाब सरकारसाठी निश्चितच चिंतेचा विषय बनली आहे.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत १६ पैकी ९ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत राज्य सरकारने दिली आहे. मात्र, उर्वरित ७ प्रकरणांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शेतीसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कर्जमाफी, वेळेवर विमा भरपाई आणि इतर सहाय्य शेतकऱ्यांसाठी जीवनरक्षक ठरू शकते.

गेल्या वर्षी ३७ शेतकऱ्यांनी केली होती आत्महत्या
हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षभरात म्हणजे १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एकूण ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात प्रत्येकी २, जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी १, सप्टेंबर आणि मेमध्ये प्रत्येकी ३, ऑक्टोबरमध्ये ४, मार्चमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये ८ अशा ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने