अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

अभ्यासाचे नियोजन आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
05 जून 2025 
हिंगोली- स्पर्धा परीक्षांमध्ये जर यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या वेळापत्रकाचे नियोजन, सातत्य,सराव आणि आत्मविश्वास ठेवला तर कुठलेही ध्येय मिळविणे अवघड नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी शिवाजीराव देशमुख सभागृह येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा प्रसंगी बोलताना केले.
 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या वतीने जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचे वैयक्तिक अनुभव सांगताना विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. परिक्षे करिता उपलब्ध असणारा कालावधी आणि त्या अनुषंगाने अभ्यासाचे वेळेचे नियोजन, केलेल्या अभ्यासाचा सारांश आणि त्याचा सराव, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव आणि त्यातून स्वतःची गुणवत्ता पारखणे, याचबरोबर स्वतःवरील खंबीर आत्मविश्वास, इतरांशी तुलना न करता केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करून परीक्षांना सामोरे जा. एका प्रयत्नात यश मिळाले नाही तरी खचून न जाता अधिक उमेदीने पुन्हा तयारीला लागा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. या चर्चासत्राला शहरातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न उपस्थित केले. ज्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय समर्पक असे उत्तर देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रद्युम्न गिरीकर यांनी केले.
 दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी मार्गदर्शन कार्यशाळा* स्पर्धा परीक्षा मधून यश मिळवून शासकीय सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत महिन्याच्या पहिल्या बुधवारी अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करण्याचा संकल्प यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अनुभवी व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे अधिक सोपे जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने