हिंगोलीत लाचखोरीचा यशस्वी सापळा – 10,000 रूपयांची लाच घेताना डेटा एंट्री ऑपरेटर रंगेहाथ अटक!

 हिंगोलीत लाचखोरीचा यशस्वी सापळा – 10,000 रूपयांची लाच घेताना डेटा एंट्री ऑपरेटर रंगेहाथ अटक!

हिंगोली, दि. 23 सप्टेंबर 2025 महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, हिंगोली येथील इन्चार्ज डेटा एंट्री ऑपरेटर (कंत्राटी) म्हणून कार्यरत गोविंद संभाजी दहिफळे (वय 37) याला 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोलीच्या चमूने ही यशस्वी सापळा कारवाई केली.


तक्रारीचा तपशील

एक 29 वर्षीय तक्रारदार यांची आई व चुलत मामा हे बांधकाम कामगार होते. त्यांच्या मृत्यूनंतर विमा लाभ (क्लेम) मिळवण्यासाठी तक्रारदाराने 5 मे 2025 रोजी आईच्या व एप्रिल 2025 मध्ये मामाच्या नावे

आवश्यक कागदपत्रांसह हिंगोली येथील कामगार कल्याणकारी मंडळात अर्ज दाखल केला होता.

यासंदर्भात 22 सप्टेंबर रोजी आरोपी गोविंद दहिफळे याची भेट घेतल्यावर, त्याने कामासाठी “माझी आणि साहेबांची ओळख आहे, तुझं काम करून देतो पण त्यासाठी 50,000 रुपये लागतील” असे स्पष्ट सांगून लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली येथे तक्रार दाखल केली.


तपासणी आणि सापळा कारवाई

तक्रारीची पडताळणी 22 सप्टेंबर 2025 रोजी पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आली. पडताळणीत आरोपीने तक्रारदाराकडे “दोनही प्रकरणासाठी 50,000 रुपये दे” अशी लाचेची मागणी पुन्हा स्पष्टपणे केली. त्यातील 10,000 रुपये 23 सप्टेंबरला देण्याची आणि उरलेली रक्कम काम पूर्ण झाल्यावर घेण्याची तयारी त्याने दर्शवली.

त्यानुसार 23 सप्टेंबर रोजी संजिवनी बाल रुग्णालयासमोर, तापडिया इस्टेट रोड, हिंगोली येथे आरोपी दहिफळे याने तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच प्रत्यक्षात घेतली. ती रक्कम त्याने स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.


आरोपीकडून मिळालेल्या वस्तू

अंगझडतीदरम्यान आरोपीकडे खालील वस्तू आढळून आल्या:

  • रोख रक्कम ₹2,860/-
  • विवो कंपनीचा मोबाईल
  • पॅन कार्ड, आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पिवळ्या धातूच्या दोन अंगठ्या
  • ॲक्सिस बँकेचे एटीएम व क्रेडिट कार्ड

घरझडती आणि पुढील तपास

आरोपी मूळचा चिखली, ता. अहमदपूर, जि. लातूर येथील रहिवासी असल्याने, त्याच्या घरी झडती घेण्यासाठी लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागास सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.


गुन्हा दाखल आणि तपास सुरू

आरोपी गोविंद दहिफळे याच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याचे फॉरेन्सिक विश्लेषण करून पुढील तपास केला जाणार आहे.


सापळा कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी

सापळा अधिकारी:
श्री. विकास घनवट – पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली

सापळा पथक:
ASI युनूस शेख, विजय शुक्ला, पोह. भगवान मंडलिक, गजानन पवार, रवींद्र वरणे, पो.शी. पुंडगे, वाघ, जाधव, चापोह शेख अकबर (सर्व – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली)

मार्गदर्शक अधिकारी:
श्री. संदीप पालवे – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र
श्री. अशोक कदम – अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड परिक्षेत्र

पर्यवेक्षण अधिकारी:
श्री. विकास घनवट – पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली

लोकसेवेच्या नावाखाली भ्रष्टाचार करणाऱ्या लोकसेवकांवर कठोर कारवाई केली जाणार असून नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागास द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने