मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वसमत येथे आज तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची वसमत येथे आज तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा

जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा – नामदार हेमंत पाटील यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 

हिंगोली | दि. 07सप्टेंबर २०२५ :
हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत यांची तृतीय वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा 

 दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी वसमत येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला केंद्राचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. ना. हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतील हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती

या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता हिंगोली जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल गुप्ता (भा.प्र.से) यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती अंजली रमेश (भा.प्र.से) यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ना. हेमंत पाटील असून, विशेष उपस्थितीमध्ये संशोधन केंद्राचे संचालक अशासकीय सदस्य मा. लक्ष्मीनारायण मुरक्या, मा. सदाशिव पुंड, मा. संभाजी सिद्धेवार, मा. शिवाजी काकडे, मा. रितेश जूजाराव, मा. मनमथ सिद्धेवार, मा. श्रीमती सुनंदा पोळ व मा. श्रीमती प्रतीक्षा पतंगे यांचा समावेश आहे.


हळद पिकावर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन

या जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये हळद लागवड व उत्पादनवाढ यावर तांत्रिक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. विजय काळे, प्राध्यापक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला हे "हळद लागवडीतील नवतंत्रज्ञान व शास्त्रीय पद्धती" यावर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच डॉ. अनिल ओळंबे, विषयतज्ञ, उद्यानविद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापुर हे "सद्धस्थितीत हळद पिकाची घ्यावयाची काळजी" या विषयावर शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन देणार आहेत.


पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित

या कार्यशाळेसाठी हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, अकोला तसेच परिसरातील इतर जिल्ह्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संशोधन केंद्राचे अध्यक्ष मा. हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र कदम यांनी संयुक्तपणे केले आहे.

हळद शेतीला वैज्ञानिक पद्धतींचा आधार मिळावा, उत्पादनात गुणवत्ता व प्रमाण वाढावे, तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठेतील संधींचा लाभ मिळावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ स्थळ: उषा हॉटेल अँड रेस्टॉरंट, कन्हेरगाव, वसमत-औंढा रोड, ता. वसमत, जि. हिंगोली

वेळ: सकाळी ११.०० वाजता (दि. ८ सप्टेंबर २०२५)


शेतकरी बांधवांना सुवर्णसंधी

या कार्यशाळेमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, नवतंत्रज्ञानाची ओळख व सरकारी योजनांविषयी माहिती मिळणार असून, ही एक सुवर्णसंधी असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने