हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश अतिवृष्टी; ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत
हिंगोली, 19 सप्टेंबर (महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क):
हिंगोली जिल्ह्यात आज दुपारनंतर अचानक वातावरणात मोठा बदल होत मुसळधार पावसाने हजेरी लावली. विशेषतः शहरासह काही ग्रामीण भागांमध्ये ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली असून, पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
दुपारी सुमारे 1 वाजल्याच्या सुमारास तापमानात प्रचंड वाढ झाली होती. उन्हाच्या कडाक्यामुळे जनजीवन घामाघूम झाले होते. मात्र, त्यानंतर अचानक काळोख दाटून आला आणि अवघ्या काही मिनिटांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या एका तासाच्या कालावधीत शहरासह परिसरात जोरदार सरी कोसळल्या, ज्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर काही ठिकाणी लहान नाल्यांना पूरसदृश स्वरूप आले.
ग्रामीण भागात ढगफुटीचा अंदाज:
काही ग्रामीण भागांतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पावसाचा जोर इतका होता की ढगफुटीसदृश दृश्य अनुभवायला मिळाले. विशेषतः आणि काही भागांत जमिनीवर पाणी साचून रस्ते पूर्णपणे जलमय झाले. शेतकरी वर्गामध्ये यामुळे संमिश्र भावना असून, काही भागांतील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची मोठी धावपळ:
पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे हाल झाले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान . काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याचे देखील वृत्त आहे.
प्रशासन सज्ज, मात्र मदतीची प्रतीक्षा:
स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतत संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. मात्र, काही भागांमध्ये अजूनही मदतीसाठी लोक प्रतीक्षेत आहेत. तहसील आणि ग्रामपंचायत पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतीचे नुकसान होण्याची शक्यता:
अनेक शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज न लावता खरीप पिकांची शेवटची फवारणी केली होती. मुसळधार पावसामुळे कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याचे संकेत मिळत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा