लिंबाळा मक्ता येथे एस.टी. बसच्या धडकेत एकाचा मृत्यू – संतप्त नातेवाईकांकडून चालकाला मारहाण व बसची तोडफोड – चालकाची पोलिसांत तक्रार

लिंबाळा मक्ता येथे एस.टी. बसच्या धडकेत एकाचा मृत्यू – संतप्त नातेवाईकांकडून चालकाला मारहाण व बसची तोडफोड – चालकाची पोलिसांत तक्रार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली (दि. 18 सप्टेंबर 2025): औंढा ते हिंगोली मार्गावरील लिंबाळा मक्ता गावाजवळील बस स्टँड परिसरात भरधाव एस.टी. बसच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अपघातात संतोष नारायण पवार (रा. लिंबाळा मक्ता, वय अंदाजे 30 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी एस.टी. बस चालकाला मारहाण करत बसची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली.

ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. संतोष पवार हा एमआयडीसी लिंबाळा मक्ता येथे कामावर पायी जात असताना औंढा बाजूकडून भरधाव येणाऱ्या एस.टी. बस (क्र. एम.एच. 13 सी.यू. 6917) ने जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
मयताचा भाऊ कठाळु नारायण पवार (वय 35) यांनी हिंगोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक नारायण महादेवअप्पा मीटकरी (रा. हिंगोली) याच्याविरुद्ध कलम 106(1), 281, 125(5)(1), 281, 125(बी) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर जमावाने ताब्यात घेतलेल्या चालकास ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर संतप्त जमावाने एस.टी. बसच्या काचांवर दगडफेक करत बसची मोठी तोडफोड केली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

या मारहाणीच्या घटनेनंतर संबंधित बस चालकाने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नातेवाईकांविरुद्ध स्वतंत्र तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता.

या दुर्दैवी घटनेमुळे लिंबाळा मक्ता परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी एस.टी. महामंडळाने अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे.
 तपासामध्ये पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील  तपास सुरू आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने