हिंगोली पोलीस दलाचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात — मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रु. 23,81,222/- चा धनादेश सुपूर्द
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. १४ ऑक्टोबर — महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून हिंगोली पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. हिंगोली जिल्हा पोलीस दलाने आपल्या एक दिवसाच्या पगाराचा निधी म्हणजेच एकूण रु. 23,81,222/- इतका धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी (आपत्ती व्यवस्थापन) साठी अर्पण केला.
हा धनादेश हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे (भा.पो.से) यांनी जिल्हाधिकारी श्री. राहुल गुप्ता (भा.प्र.से) यांच्याकडे अधिकृतरीत्या सुपूर्द केला. या वेळी हिंगोली विधानसभेचे आमदार श्री. तानाजी मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना गृह पोलीस उपाधीक्षक दत्ता केंद्रे पोलीस निरीक्षक श्याम कुमार डोंगरे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत पोहोचविण्यासाठी हिंगोली पोलीस दलाने दाखविलेली संवेदनशीलता व सामाजिक जबाबदारीचे भान हे कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी या पुढाकाराबद्दल पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले.
पोलीस अधीक्षक श्री. कोकाटे यांनी सांगितले की, "शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्याच्या अडचणीच्या काळात आपण सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. समाजाप्रती असलेली जबाबदारी पोलीस दल नेहमी जपेल," असे ते म्हणाले.
या उपक्रमामुळे हिंगोली पोलीस दलाचे समाजातील संवेदनशील आणि सेवाभावी रूप पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा