राज्यातील नगर पालिका निवडणुकांचे वाजले बिगुल!१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल • २ डिसेंबर रोजी मतदान • ३ डिसेंबरला निकाल

राज्यातील नगर पालिका निवडणुकांचे वाजले बिगुल!
१० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल • २ डिसेंबर रोजी मतदान • ३ डिसेंबरला निकाल


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

हिंगोली, ४ नोव्हेंबर:

२०१६ पासून रखडलेल्या नगरपरिषद निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून निवडणूक प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


निवडणुकीचा कार्यक्रम

  • १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
  • १८ नोव्हेंबर: अर्जांची छाननी
  • २१ नोव्हेंबर: अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
  • २५ नोव्हेंबर: अपिल असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
  • २६ नोव्हेंबर: अंतिम उमेदवार यादी जाहीर
  • २ डिसेंबर: मतदान
  • ३ डिसेंबर: मतमोजणी

महत्त्वाचे बदल व वैशिष्ट्ये

  • यंदा तिसऱ्यांदा नगराध्यक्षांची थेट निवडणूक जनतेतून होणार
  • प्रत्येक मतदाराला तीन मते देण्याचा अधिकार — दोन नगरसेवकांसाठी आणि एक नगराध्यक्षासाठी
  • ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा
  • ईव्हीएमद्वारेच मतदान
  • मोबाईल मतदान केंद्राच्या इमारतीपर्यंत नेता येईल
  • ७ नोव्हेंबरला मतदान केंद्रनिहाय याद्या जाहीर
  • मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू

हिंगोलीत रंगणार तुफानी लढत

हिंगोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील तीनही मित्रपक्ष स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरवतील, असा अंदाज आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.

हिंगोलीत शिवसेना जिल्हा प्रमुख आ. संतोष बांगर यांच्या भावजई सौ. रेखा श्रीराम बांगर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते.
भाजपकडून माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या पत्नी सौ. निता बांगर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच बळ मिळवल्याने हा पक्षही महत्त्वाचा स्पर्धक ठरणार आहे.


वसमत नगरपरिषदेची स्पर्धा अधिक रंगतदार

वसमतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली आघाडी घेतली असून एकूण १२ इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.
त्यात फरहीन बेगम सय्यद इमरान अली, सौ. सुनीता मनमोहन बाहेती, सौ. रुपाली सचिन दगडू यांची नावे अग्रस्थानी आहेत.

काँग्रेसकडून सौ. सीमा अब्दुल हाफिज, भाजपकडून सुषमा शिवदास बोडेवार,
शिवसेना (उबाठा गट) कडून डॉ. रेणुका गजानन पतंगे,
तर शिवसेना (शिंदे गट) कडून सौ. सविता मारुती क्यातमवार संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.


कळमनुरीत राजकीय शांतता

कळमनुरीत सध्या राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे काही संभाव्य नावे समोर आली असली तरी पक्षपातळीवर गंभीर चर्चा झालेली नाही. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने पुढील काही दिवसांत येथील राजकारणात चांगलीच चळवळ सुरू होईल, असा अंदाज आहे.


राज्यातील सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून, २ डिसेंबर रोजीचा मतदानाचा दिवस महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने