बहुचर्चित 10 कोटींच्या अपहार प्रकरणात श्री कुलस्वामीनी महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या सचिवास तात्पुरता जामीन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
25 डिसेंबर 2025
हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या सुमारे 10 कोटी 68 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सचिव सारिका बजरंग खर्जुले यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. हा आदेश दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी देण्यात आला.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, लेखपाल संजय सिताराम जाजु यांनी दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे लेखी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने संस्थेच्या 4810 ठेवीदारांना अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण 10,68,41,433 रुपये जमा करून त्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली.
या गंभीर आरोपांवरून पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा क्रमांक 934/2023 नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हा भा.दं.वि. कलम 420, 408, 409, 120(ब) तसेच MPID कायद्याच्या कलम 3 व 4 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सोसायटीच्या सचिव असल्याच्या आरोपावरून सारिका बजरंग खर्जुले यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांनी आपल्या वकिलामार्फत हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपींच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी जामीन अर्ज सादर करून प्रभावी युक्तिवाद केला.
إرسال تعليق