हिंगोलीत लाचखोर लिपिक रंगेहात अटकेत; पुरवठा विभागातील क्लर्ककडून ₹3,000 लाच स्वीकारताना एसीबीचा यशस्वी सापळा



हिंगोलीत लाचखोर लिपिक रंगेहात अटकेत; पुरवठा विभागातील क्लर्ककडून ₹3,000 लाच स्वीकारताना एसीबीचा यशस्वी सापळा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
 08 जानेवारी 2026
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या पुरवठा विभागातील लिपिक/टंकलेखक चक्रधर पंडितराव कदम (वय 39) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. बी.पी.एल./प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या भावाकडून लाचेची मागणी करून ती स्वीकारताना दि. 08 जानेवारी 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.
नेमकी घटना काय आहे?
तक्रारदार (पुरुष, वय 38) व त्यांच्या भावाने दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी कुटुंबातील सदस्यांची नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करून बी.पी.एल. योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालय, कळमनुरी येथे अर्ज केला होता. शिधापत्रिका मिळूनही प्रत्यक्षात स्वस्त धान्याचा लाभ मिळत नसल्याने त्यांनी वेळोवेळी संबंधित कार्यालयात पाठपुरावा केला.
अखेर दि. 06 ऑक्टोबर 2025 रोजी प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अंतर्गत समावेश करून देण्यासाठी पुन्हा अर्ज सादर करण्यात आला.
₹8,000 लाचेची मागणी, नंतर ₹3,000 वर सौदा
यानंतर दि. 08 डिसेंबर 2025 रोजी तक्रारदार कामाच्या अनुषंगाने पुरवठा विभागातील क्लर्क चक्रधर कदम यांना भेटले असता, अंतिम आदेश काढून देण्यासाठी प्रत्येकी ₹4,000 प्रमाणे एकूण ₹8,000 लाचेची मागणी करण्यात आली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने दि. 09 डिसेंबर 2025 रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, आरोपीने लाचेची रक्कम कमी करून प्रत्येकी ₹1,500 प्रमाणे दोन फाईल्ससाठी एकूण ₹3,000 स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीचा सापळा आणि रंगेहात अटक
तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर दि. 08 जानेवारी 2026 रोजी एसीबीने सापळा रचला. कळमनुरी तहसील कार्यालयातील आपल्या चेंबरमध्ये आरोपीने तक्रारदारास लाचेची रक्कम टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितले. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत रक्कम स्वीकारताच एसीबी पथकाने तत्काळ छापा टाकून आरोपीस रंगेहात पकडले.
अंगझडतीत काय आढळले?
आरोपीच्या अंगझडतीदरम्यान
कार्यालयीन ओळखपत्र, चष्मा, पेन, ऑफिसची चावी, हातरुमाल व विवो कंपनीचा मोबाईल आढळून आला. मोबाईलची तपासणी करून आवश्यकतेनुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया एसीबी यवतमाळ पथकाकडून सुरू आहे.
कायदेशीर कारवाई सुरू
या प्रकरणी पोलीस स्टेशन कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीस लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आहे.
तपास व मार्गदर्शन
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु (एसीबी हिंगोली) करत असून, संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
कारवाई मध्ये 
ASI विजय शुक्ला पोह/ भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, रवींद्र वरणे, गोविंद पो.शी. पुंडगे, जाधव चापोह शेख अकबर यांनी सहभाग घेतला होता


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने