वाळू चोरी प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती भंडारी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
5 जानेवारी 2026
हिंगोली जिल्ह्यातील नरसी ना पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल वाळू चोरी प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा. भंडारी मॅडम यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केल्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणातील आरोपी सुरज प्रभाकर चाकोतकर, रा. नरसी ना, ता. व जि. हिंगोली याच्याविरुद्ध दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी कायदू नदीच्या पात्रातून अवैध वाळू चोरी केल्याप्रकरणी नरसी ना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गु. र. नं. ०९/२०२२ अन्वये कलम ३७९ भा.दं.वि., तसेच गौण खनिज अधिनियम कलम ४८ (७)(८) व मोटार वाहन कायदा कलम ३(१), १८१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तपासानंतर तपासीक अंमलदारांनी विद्यमान प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची नोंद RCC २९१/२०२२ सरकार विरुद्ध सुरज अशी करण्यात आली होती.
सरकारी पक्षाच्या वतीने या प्रकरणात एकूण पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे अपुरे व दोष सिद्ध करण्यास असमर्थ असल्याचे नमूद केले.
अखेर दिनांक ०५ जून २०२६ रोजी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भंडारी मॅडम यांनी आरोपी सुरज प्रभाकर चाकोतकर याची निर्दोष मुक्तता केल्याचा आदेश दिला.
आरोपीच्या वतीने अॅड. जी. के. गायकवाड पाटील यांनी प्रभावीपणे काम पाहून युक्तिवाद केला. त्यांना अॅड. ओम पतंगे व अॅड. रवीकुमार जाधव यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق