सीईओ विवेक गायकवाड यांना ‘सेवाकर्मी’ पुरस्कार; हिंगोली जि.प.ला १०० पैकी ८० गुण
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
12 फेब्रुवारी 2026
हिंगोली : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या विशेष कार्यकार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना ‘सेवाकर्मी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या मूल्यमापनात हिंगोली जिल्हा परिषदेने १०० पैकी ८० गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
राज्य शासनाने प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता व सेवा वितरणातील सुधारणा यावर भर देत १५० दिवसांचा हा विशेष कार्यक्रम राबविला होता. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कामकाज अधिक गतीमान आणि सुटसुटीत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी हे या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. सर्व कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली राबवून कागदविरहित, पारदर्शक आणि जलद कामकाजाला चालना देण्यात आली. यामुळे प्रलंबित प्रस्तावांच्या निकाली काढण्यास वेग आला.
तसेच, रखडलेल्या पदोन्नत्यांचे प्रश्न मार्गी लावणे, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची अंमलबजावणी, तसेच कार्यालयीन शिस्तीची काटेकोर अंमलबजावणी यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या. या सर्व सुधारणा उपायांमुळे प्रशासनात शिस्त, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढल्याचे दिसून आले.
या सर्व कामांचे राज्यस्तरीय मूल्यमापन करण्यात आले असून, त्यात हिंगोली जिल्हा परिषदेला १०० पैकी ८० गुण मिळाले. या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे राज्यातील ८ जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा ‘सेवाकर्मी’ पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला असून, त्यात विवेक गायकवाड यांचे नाव आहे.
या यशाबद्दल जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, जिल्ह्यातील प्रशासन अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा सन्मान प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा