ज्येष्ठ पत्रकार बालाजी पाठक यांचे हृदयविकाराने निधन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
७ मार्च 2026
हिंगोली शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सुपरफास्ट न्यूज चॅनलचे प्रतिनिधी बालाजी पाठक यांचे आज (शनिवार) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंगोलीतील पत्रकारितेच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे हिंगोली शहरातील रहिवासी असलेले बालाजी पाठक यांनी प्रेस फोटोग्राफर म्हणून आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वृत्तसंकलन आणि पत्रकारितेत सक्रिय काम करत सुपरफास्ट न्यूज चॅनलचे पत्रकार म्हणून जवळपास ३५ वर्षे हिंगोली शहरात काम केले. आपल्या अचूक, तटस्थ आणि धाडसी बातम्यांमुळे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते.
सरळ स्वभाव, मनमिळावू वृत्ती आणि सर्वांशी जुळवून घेणारी त्यांची शैली यामुळे ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील विविध क्षेत्रातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक घडामोडींचे त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहिण असा मोठा परिवार आहे. तसेच ते प्रेस फोटोग्राफर सुनील पाठक यांचे मोठे भाऊ होते.
बालाजी पाठक यांच्या निधनाची वार्ता समजताच हिंगोलीतील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले असून हिंगोली पत्रकारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्या निधनामुळे हिंगोलीच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा