सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात; अस्मिता उदगीरे यांच्याकडे एक दिवस ठाणे अधिकाऱ्याची जबाबदारी

सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये महिला दिन उत्साहात;  अस्मिता उदगीरे यांच्याकडे एक दिवस ठाणे अधिकाऱ्याची जबाबदारी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
9 मार्च 2026 
 हिंगोली
जागतिक महिला दिनानिमित्त सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर महिलांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधत सेनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत महिला अंमलदार अस्मिता उदगीरे यांना एक दिवसासाठी सेनगाव पोलीस स्टेशनच्या ठाणे अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यामुळे महिलांमध्ये नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश देण्यात आला.
तसेच इतर महिला कर्मचारी कल्पना वाघमारे, इंगोले, शेख यासमीन आणि प्रियंका गिराम यांनी PSO, CCTNS, VHF तसेच ट्रॅफिक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत आपली कार्यक्षमता दाखवून दिली. या माध्यमातून महिलाही सर्व प्रकारची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकतात, हे अधोरेखित करण्यात आले.
यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व महिलांचा शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, सेनगाव येथे महिला दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षिततेबाबत, हक्कांबाबत तसेच विविध कायदेशीर अधिकारांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा यमुनाबाई देशमुख, माजी नगराध्यक्ष, डॉ. हराळ मॅडम, देशमुख मॅडम, वकील वर्षा थिटे मॅडम, शिक्षिका बेंगाळ चिलगर मॅडम, पोलिस पाटील, महिला होमगार्ड यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून आत्मविश्वासाने समाजात पुढे यावे. आधुनिक युगात सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळवून कुटुंब व समाजासाठी आदर्श बनावे. तसेच पुढील पिढी घडविताना मुलांना चांगले संस्कार देऊन सुदृढ समाजनिर्मितीत महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
महिला दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सेनगाव पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने