लोखंडी कत्तीचा धाक दाखवून दुचाकीस्वाराची ५२ हजारांची लूट
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 मार्च 2026
हिंगोली,
नंबर प्लेट नसलेली चारचाकी जीप दुचाकीसमोर आडवी लावून लोखंडी कत्तीचा धाक दाखवत दुचाकीस्वाराला जबरदस्तीने जीपमध्ये बसवून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे ५२ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना हिंगोली ते जवळा पळशी रोडवर घडली आहे. या प्रकरणी अनोळखी तिघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नांदुरा येथील संदीप देवराव तनपुरे हे १३ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास दुचाकीने हिंगोली ते जवळा पळशी मार्गे जात होते. दरम्यान, रस्त्यात अचानक नंबर प्लेट नसलेली जीप त्यांच्या दुचाकीसमोर आडवी लावण्यात आली. त्या जीपमधून उतरलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी तनपुरे यांना जबरदस्तीने जीपमध्ये बसवले.
यानंतर आरोपींनी लोखंडी कत्ती व पाईपचा धाक दाखवत त्यांच्या खिशाची झडती घेतली. त्यांच्याकडील रोख ४२ हजार रुपये, अंदाजे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच इतर साहित्य जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. लूट केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर संदीप तनपुरे यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे करीत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरात तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यांवर घडणाऱ्या अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा