हिंगोलीत अवकाळी पावसाचा कहर : सुसाट वाऱ्यासह विजांचा कडकडाट, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित

हिंगोलीत अवकाळी पावसाचा कहर : सुसाट वाऱ्यासह विजांचा कडकडाट, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
30 मार्च 2026 
हिंगोली, प्रतिनिधी : जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत सुसाट वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे.
शहरासह तालुक्यातील विविध भागांत जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, खराब हवामानामुळे रस्त्यावर वाहन चालविणे धोकादायक ठरत असल्याने पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी वाहन चालकांना आवाहन करताना सांगितले की, “पावसादरम्यान आणि विजांच्या कडकडाटात वाहन चालकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल.”
ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, वीज विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
हवामान खात्याने पुढील काही तासांत पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने