हिंगोली जिल्ह्यात चालक पोलीस शिपाई भरती – वाहनचालक कौशल्य चाचणी २३ ते २७ मार्चदरम्यान
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 मार्च 2026
हिंगोली, दि. २० (प्रतिनिधी) – हिंगोली जिल्हा पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई (सन २०२४–२०२५) भरती प्रक्रियेअंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी २३ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी दररोज सकाळी ५.०० वाजल्यापासून श्री संत नामदेव कवायत मैदान, हिंगोली येथे पार पडणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र उमेदवारांचे नावनिहाय सविस्तर वेळापत्रक हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन आपला दिनांक व वेळ निश्चित करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या चाचणीसाठी उपस्थित राहताना उमेदवारांनी शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र तसेच मैदानी चाचणीदरम्यान देण्यात आलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. नियोजित वेळेनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना चाचणीसाठी संधी दिली जाणार नाही, याचीही स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा असून, उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करून आवश्यक कागदपत्रांसह चाचणीसाठी हजर राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा