हिंगोलीत डायल 112 वर खोटी माहिती देऊन आत्महत्येची धमकी; देणाऱ्या तरुणाला पोलिसाचा दणका
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
22 एप्रिल 2026
हिंगोली (प्रतिनिधी): जिल्ह्यातील हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने डायल 112 प्रणालीवर खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच संबंधित तरुणाने आत्महत्येची धमकी देत लोकसेवकांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरोधात एन.सी. दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 21 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.44 वाजता मौजे जामठी खु. (ता. जि. हिंगोली) येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याची खोटी माहिती डायल 112 वर देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकारावर तात्काळ कारवाई न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देण्यात आली.
या प्रकरणी महादेव प्रल्हाद आठवले (वय 25, रा. जामठी खु.) याच्यावर कलम 217 व 226 भा.न्या.सं. 2023 अंतर्गत एन.सी. क्र. 0105/2026 नोंदविण्यात आली आहे. फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई सुधीर माधवराव तपासे (वय 40) यांनी तोंडी फिर्याद दिली आहे.
या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ वाया गेला असून, अधिकृत कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी देऊ नयेत, तसेच आपत्कालीन सेवांचा गैरवापर टाळावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्ष श्याम कुमार डोंगरे यांच्या आदेशाने पोलीस हवालदार राजकुमार जमधाडे हे करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा