हिंगोली : 32 वर्षांच्या उल्लेखनीय सेवेनंतर एएसआय संतोष वाठोरे यांचा सत्कार करून निरोप
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
18 एप्रिल 2026
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) संतोष वाठोरे यांची बासंबा येथे बदली झाल्याने त्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. तब्बल 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत वाठोरे यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
संतोष वाठोरे यांनी आपल्या सेवाकाळात हिंगोली शहर येथे 6 वर्ष, बाळापूर येथे 6 वर्ष, पोलीस मुख्यालयात 7 वर्ष, एलसीबी (LCB) मध्ये 5 वर्ष, हिंगोली ग्रामीण येथे 6 वर्ष तसेच जिल्हा डीएसबीमध्ये 2 वर्ष सेवा बजावली आहे. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
विशेष म्हणजे, त्यांनी चोरी व घरफोडीचे तब्बल 42 गुन्हे उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मा. पोलीस महासंचालक यांचे पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहकाऱ्यांमध्ये आदर्श निर्माण केला. त्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि शिस्तप्रियतेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांना विशेष मान होता.
निरोप समारंभाच्या वेळी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी वाठोरे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, महिला पोलीस निरीक्षक श्री वघे तसेच ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाठोरे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक व्यक्त करत त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा