हिंगोलीत हेल्मेट सक्ती व वाहतूक नियम जनजागृती अभियानाचा शुभारंभ . पोलीस अधीक्षक निलाभ रोहन

हिंगोलीत हेल्मेट सक्ती व वाहतूक नियम जनजागृती अभियानाचा शुभारंभ. निलाभ रोहन 

हिंगोली, दि. १८ एप्रिल — महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून मनुष्यहानीत किमान १० टक्के घट घडवून आणण्याच्या उद्देशाने हिंगोली जिल्ह्यात व्यापक स्तरावर हेल्मेट सक्ती व वाहतूक नियम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदान परिसरात होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिली.
राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट सक्तीबरोबरच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध विभागांचे समन्वय साधून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी, प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन करणारे वैद्यकीय पथक, महामार्ग विभागाचे अभियंते, परिवहन विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, खासगी प्रवासी वाहन चालक, तसेच रस्ते अपघातांमध्ये मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी देखील या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन, अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, तसेच अपघातानंतर त्वरित प्रथमोपचार कसा द्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याची सवय रुजवण्यावर भर दिला जाणार आहे.
डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. “हेल्मेटचा वापर, वेगमर्यादा पाळणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात,” असे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच सुरक्षित व जबाबदार वाहतुकीची सवय अंगीकारून स्वतःचे व इतरांचे जीवन सुरक्षित ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने