कळमकोंडा येथे लग्नातील नवरदेवाचा बूट लपवण्यावरून वाद; चाकू हल्ल्यात दोघे जखमी,

कळमकोंडा येथे लग्नातील नवरदेवाचा बूट लपवण्यावरून वाद; चाकू हल्ल्यात दोघे जखमी,
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28 एप्रिल 2026
हिंगोली (प्रतिनिधी) – तालुक्यातील कळमकोंडा येथे लग्न समारंभात झालेल्या किरकोळ कारणावरून वादाचे गंभीर रूप धारण होत चाकू हल्ल्यापर्यंत प्रकरण पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास कळमकोंडा येथील प्रमोद घुगे यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. गावातील गजानन पातळे यांच्या मुलीच्या लग्नात नवरदेवाचा बूट लपवण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद मनात ठेवून आरोपींनी संगनमताने साक्षीदार गणेश जगन डाळ यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या मारहाणीदरम्यान आरोपी विष्णु बालाजी कुंभारकर याने कमरेला असलेल्या खंजीराने गणेश डाळ यांच्या पोटात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी श्रावण फुलाजी गाढवे हे त्यांना सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने “एकाला खतम केले, आता तुलाही करतो” अशी धमकी देत त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. तसेच इतर आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 109, 118(2), 115(2), 351(2), 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4/25 अन्वये गुन्हा क्रमांक 0256/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा एमएलसी जबाब प्राप्त झाल्यानंतर दिनांक 28 एप्रिल रोजी  गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सध्या आरोपी क्रमांक 1 व 2 हे जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे पोलिसांच्या देखरेखी खाली  उपचार घेत आहेत, तर आरोपी क्रमांक 3 व 4 फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भेट देऊन पंचनामा केला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे तसेच कर्मचारी राठोड यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने