पेडगाव वाडी जवळ पुरुषाचा सांगाडा सापडल्याने परिसरात खळबळ. घटनास्थळी पोलीस

पेडगाव वाडी जवळ पुरुषाचा सांगाडा सापडल्याने परिसरात खळबळ. घटनास्थळी पोलीस 
27 एप्रिल 2026
हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली तालुक्यातील पेडगाव वाडी परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून रस्त्याच्या बाजूला एका अज्ञात पुरुषाचा सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास बासंबा पोलीस स्टेशन  हद्दीत समोर आली.
स्थानिक नागरिकांना रस्त्याच्या कडेला मानवी सांगाडा दिसून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सांगाड्याची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, हा सांगाडा अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील पुरुषाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपविभागीय अधिकारी कुंदन कुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मीना यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांकडून पाच विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, सांगाड्याची ओळख पटवण्यावर पोलिसांचे विशेष लक्ष केंद्रित आहे.
दरम्यान, “लवकरच या घटनेचा उलगडा करण्यात येईल,” असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी कुंदन वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे पेडगाव वाडी व आसपासच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने