इडोळी जवळ भरधाव टिपरची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
19 एप्रिल 2026
इडोळी (ता. हिंगोली) : भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या टिपरने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास इंचा पाटी ते महादेव मंदिर दरम्यानच्या वळण रस्त्यावर घडली.
मृत व्यक्तीचे नाव केदार जानबा जाधव (वय ३६, रा. इडोळी) असे असून ते आयकॉन अॅग्रो कंपनी लिमिटेड येथे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त ते नेहमी हिंगोली येथे ये-जा करत असत.
घटनेच्या दिवशी केदार जाधव हे हिंगोलीहून जवळा पळशी रोडने इडोळीच्या दिशेने त्यांच्या मोटारसायकल (क्र. एमएच ३८ एबी ३४९६) वरून जात होते. दरम्यान, इंचा पाटी ते महादेव मंदिर दरम्यानच्या वळणावर मागून भरधाव वेगात आलेल्या टिपरने (क्र. एमएच ३८ एक्स ३६३१) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. धडकेमुळे ते रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला, छातीला, मानेसह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या भावाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी केदार जाधव हे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेले आढळले. त्यांना तात्काळ अॅम्बुलन्सने शासकीय रुग्णालय, हिंगोली येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित टिपर चालकाने धडक दिल्यानंतर काही क्षण थांबण्याचा बहाणा करत मागे पाहिले, मात्र नंतर घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात टिपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या भावाने पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मृत केदार जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व कुटुंबीय असा मोठा परिवार असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू
टिप्पणी पोस्ट करा