पत्रकारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – आ. संतोष बांगर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 एप्रिल 2026
हिंगोली (प्रतिनिधी) – समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असून यासाठी लवकरच सर्व संबंधितांची मुंबईत सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार संतोष बांगर यांनी दिली.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी पत्रकार वेल्फेअर सोसायटी, हिंगोली यांच्या वतीने आयोजित बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध माध्यमांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. संतोष बांगर म्हणाले की, पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून ते अहोरात्र जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत असतात. अशा पत्रकारांच्या घराचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण सर्व पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लवकरच मुंबई येथे आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजू भैय्या नवघरे, इतर लोकप्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक बैठक घेऊन सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या प्रारंभी पत्रकार वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आ. संतोष बांगर यांचा सत्कार अध्यक्ष कल्याण देशमुख व सचिव सुनिल पाठक सुधाकर वाढवे संदीप नागरे विजय गुंडेकर मनीष खरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रणही प्रदान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रकाश इंगोले यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन सुनिल पाठक यांनी केले.
या बैठकीस प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियातील प्रतिनिधी व प्रेस फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा