हिंगोलीत महिलेचा विनयभंग; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोलीत महिलेचा विनयभंग; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
03 एप्रिल 2026
हिंगोली,  शहरातील एका ३५ वर्षीय महिलेसोबत विनयभंग व मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शहरात ऑटोने प्रवास करत असताना इरफान सरदारखान पठाण याने तिच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने माझ्याकडे फक्त ३०० रुपये असल्याचे सांगितले असता आरोपीने तिच्याशी उद्धट वर्तन करत “तुझी पैसे देण्याची औकात नाही तर ऑटो कशाला लावला” असे म्हणत वाद घातला. यानंतर आरोपीने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, १ एप्रिल रोजी महिला व तिची बहीण आरोपींकडे जाब विचारण्यासाठी गेल्या असता, अंजुमखान इरफानखान पठाण हिने दोघींना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच महिलेचे केस पकडून तिला ढकलले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर पीडित महिलेने हिंगोली शहर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार इरफान सरदारखान पठाण, इमरान सरदारखान पठाण, अरबाज सरदारखान पठाण व अंजुमखान इरफानखान पठाण (सर्व रा. मस्तानशहा नगर, हिंगोली) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने