हिंगोलीत १० लाखांच्या प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

हिंगोलीत १० लाखांच्या प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. २१ मे २०२६ :
हिंगोली शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या एका कारमधून तब्बल १० लाख ६ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सूर्यमुखी हनुमान मंदिराजवळ, पेन्शनपुरा परिसरात संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी एमएच-३८ ए.के. ३९०५ क्रमांकाच्या मारुती सुझुकी फ्रॉन्स कारमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी विविध प्रकारचा विमल पान मसाला, व्ही-०१ तंबाखू तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. त्यामध्ये अंदाजे १ लाख ३२ हजार रुपयांचा विमल पान मसाला, ९ हजार ६८० रुपयांचा व्ही-०१ तंबाखू, ४८ हजार रुपयांचा अन्य गुटखा माल, २ हजार रुपयांचा व्ही-०१ बिंग पाऊच, १५ हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ८ लाख रुपयांची कार असा एकूण १०,०६,६८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई सतीश दत्तराव नरवाडे यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत होता.
   पुढील तपास  पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. धामणे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने