मोजणी शीट देण्यासाठी १० हजारांची लाच घेताना दोन भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात
हिंगोलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; आरोपी रंगेहात पकडले
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २२ मे २०२६ — शेतजमिनीच्या मोजणी शीटची प्रत देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील दोन भूकरमापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने हिंगोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी आरोपी म्हणून उमेश मधुकर राऊत (वय ३८) व अविनाश नंदकिशोर गोरे (वय ४४) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, हिंगोली येथे भूकरमापक (सर्वेअर) म्हणून कार्यरत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रिसाला बाजार येथील ४४ वर्षीय तक्रारदार यांची मौजे बासंबा येथील गट क्रमांक ६५८ मधील ३६ आर शेतजमिनीची मोजणी करण्यात आली होती. मात्र, मोजणी पूर्ण होऊनही संबंधित मोजणी शीटची प्रत तक्रारदारांना मिळाली नव्हती.
ही प्रत देण्यासाठी आरोपी उमेश राऊत यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २२ मे रोजी एसीबीकडे करण्यात आली. त्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान दोन्ही आरोपींनी यापूर्वी ४ हजार रुपये घेतल्याचे मान्य केले. तसेच उर्वरित ११ हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत १० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले.
यानंतर एसीबीने सापळा रचला. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, हिंगोली येथे सापळा कारवाईदरम्यान आरोपी अविनाश गोरे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान आरोपींची अंगझडती घेण्यात आली. आरोपी उमेश राऊत यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र, मोटोरोलाचा मोबाईल, अंगठी व ७०० रुपये रोख रक्कम मिळाली. तर आरोपी अविनाश गोरे यांच्याकडून एटीएम कार्ड, वाहन परवाना, शासकीय ओळखपत्र, विवो कंपनीचा मोबाईल, अंगठी व ५ हजार १७० रुपये रोख रक्कम आढळून आली.
मोबाईल हँडसेटची तपासणी सुरू असून आवश्यकतेनुसार ते जप्त करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीने दिली. तसेच आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत यांनी केली असून, पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी पर्यवेक्षण केले. पुढील तपासही पोलीस उपअधीक्षक विकास घनवट हे करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा