हिंगोली पोलीसांची मोठी कामगिरी : १० लाख रुपये किमतीचे ६० हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
पोलीस अधीक्षक निलाभ रोहन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ३० मे : हिंगोली जिल्हा पोलीस दलाने नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल १० लाख रुपये किमतीचे ६० अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून हिंगोली पोलीसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सायबर सेल तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार सायबर सेल हिंगोली व विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि परराज्यांमधून शोधमोहीम राबवून ६० मोबाईलचा मागोवा घेण्यात आला.
या मोहिमेदरम्यान तांत्रिक विश्लेषण, सीईआयआर (CEIR) प्रणालीचा वापर तसेच विविध राज्यांतील यंत्रणांशी समन्वय साधून हरवलेले मोबाईल शोधण्यात यश आले. आज आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, पावतीशिवाय सेकंडहँड मोबाईल खरेदी किंवा वापर करू नये. तसेच मोबाईल हरवल्यास तात्काळ स्वतः किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर माहिती नोंदवावी. यामुळे हरवलेला मोबाईल शोधणे अधिक सुलभ होते.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर कुंदनकुमार वाघमारे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ आणि पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप मोदे, गणेश राहीरे, शामकुमार डोंगरे, सुधीर वाघ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, विकास आडे आणि सोमनाथ घार्गे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
तसेच सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलीस अंमलदार दत्ता नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, गणेश लेकुळे, प्रदीप झुंगरे आणि प्रणिता मोरे यांनी तांत्रिक तपास करून मोबाईल हस्तगत करण्यात विशेष कामगिरी बजावली.
हरवलेली मालमत्ता शोधून नागरिकांना परत देण्याच्या हिंगोली पोलीसांच्या या यशस्वी उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यातही अशाच प्रभावी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा