गुणवत्तेचा गौरव : उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांच्याकडून पीएचसी गिरगावची पाहणी

गुणवत्तेचा गौरव : उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांच्याकडून पीएचसी गिरगावची पाहणी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
07 मे 2026 
हिंगोली, प्रतिनिधी :
तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सेवेला गुणवत्तेची नवी ओळख मिळवून देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगाव (ता. वसमत) येथे नुकतीच छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. कांचन वानेरे यांनी भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. ‘नॅशनल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स स्टँडर्ड’ (NQAS) हे आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च मानांकन प्राप्त झाल्यानंतर केंद्राच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती.
यावेळी डॉ. वानेरे यांनी आरोग्य केंद्रातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत आरोग्य सेवा, स्वच्छता, रुग्ण सुविधांचा दर्जा आणि प्रशासकीय व्यवस्थापन यांचे कौतुक केले. ग्रामीण भागात दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भेटीदरम्यान त्यांनी बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती कक्ष, लसीकरण विभाग, औषध साठा कक्ष, प्रयोगशाळा तसेच रुग्ण नोंदवही व रेकॉर्ड व्यवस्थापनाची तपासणी केली. केंद्रातील स्वच्छता, रुग्णांशी असलेला संवाद आणि सेवा देण्यातील शिस्तबद्धता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. एनक्यूएएस मानांकन टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे  तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांचा समावेश होता.
गिरगाव टीमचा गौरव
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्या भारती, तालुका स्तरीय पर्यवेक्षक गजानन कदम, सुनील शिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, आशा वर्कर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
एनक्यूएएससारखे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाल्यामुळे संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ग्रामीण जनतेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी आदर्श केंद्र
गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळवत ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्याचा आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्तापूर्ण सेवा, स्वच्छता, रुग्णकेंद्री सुविधा आणि सक्षम व्यवस्थापनाच्या बळावर हे केंद्र जिल्ह्यातील इतर आरोग्य संस्थांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने