हिंगोलीत गंभीर मारहाण प्रकरण: दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी, चार फरार आरोपींचा शोध सुरू

हिंगोलीत गंभीर मारहाण प्रकरण: दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी, चार फरार आरोपींचा शोध सुरू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
06 मे 2026
हिंगोली तालुक्यातील समगा येथे दिनांक 13 मार्च 2026 रोजी दोन गटांमध्ये झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणी नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, उर्वरित चार फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
समगा येथील घटनेनंतर ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 326, 118(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींनी अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मंजूर केला, मात्र उर्वरित सहा आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
जामीन नाकारण्यात आलेल्या आरोपींपैकी वैभव कदम आणि ऋषिकेश सरकटे हे दोघे आज हिंगोली ग्रामीण पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, उर्वरित चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके स्थापन केली आहेत.
या संदर्भात बोलताना पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी सांगितले की, “हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. त्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.”
या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم