दारूच्या नशेत डायल 112 वर खोटी माहिती; एकावर गुन्हा दाखलपोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांची बेधडक कारवाई

दारूच्या नशेत डायल 112 वर खोटी माहिती; एकावर गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांची बेधडक कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
12 जून 2026 
औंढा नागनाथ, प्रतिनिधी : दारूच्या नशेत डायल 112 या आपत्कालीन सेवा क्रमांकावर फोन करून पुतणी हरवल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका व्यक्तीवर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसेवकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 9 जून रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथील भगवानराव तुकाराम जाधव (वय 37) यांनी दारूच्या नशेत डायल 112 वर संपर्क साधून आपली पुतणी हरवल्याची माहिती दिली. माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे व पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी काठोडा तांडा येथे जाऊन शोधमोहीम सुरू केली असता संबंधित मुलगी ही गावातील बाजूलाच असलेल्या एका घरात सुरक्षित असल्याचे आढळून आले. त्यामुळे हरवल्याची माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान आरोपीने दारूच्या नशेत लोकसेवकांना त्रास होईल या उद्देशाने खोटी माहिती दिल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार यांच्या फिर्यादीवरून दि. 10 जून रोजी भगवानराव तुकाराम जाधव यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास जमादार सिद्दिकी करीत आहेत.
यापूर्वीही अशीच कारवाई
विशेष म्हणजे, यापूर्वीही हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दारुड्याने डायल 112 वर खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी कठोर कारवाई केली होती. त्यामुळे आपत्कालीन सेवांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
डायल 112 चा गैरवापर टाळण्याचे आवाहन
डायल 112 ही नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची सेवा आहे. खोट्या माहितीमुळे पोलीस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ वाया जात असून खऱ्या गरजूंना मदत पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने