आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रमात सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन

हिंगोली, दि. 12 (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त देशभरातील नागरिकांना एकत्र आणत योगाच्या माध्यमातून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार, पेयजल व स्वच्छता विभाग (जलशक्ती मंत्रालय) आणि हॅबिल्ड हेल्थ टेक प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.35 या वेळेत युट्यूबच्या माध्यमातून विशेष ऑनलाइन योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा मानस असून देशभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील सर्व नागरिक, महिला बचत गट, युवक मंडळे, शैक्षणिक संस्था, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
दवंडी, व्हॉट्सॲप गट, नोटीस बोर्ड, स्थानिक प्रसारमाध्यमे आणि विविध जनसंपर्क माध्यमांच्या साहाय्याने या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. देशाच्या आरोग्यवर्धनासाठी आणि योग संस्कृतीच्या प्रसारासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नोंदणीसाठी मिस्ड कॉल आवश्यक
या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्येक इच्छुक नागरिकाने 1800-315-7008 या टोल-फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर योग सत्रासाठीची युट्यूब लिंक पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक सहभागी आपल्या मोबाईलवरून स्वतंत्रपणे लॉग-इन करून योग सत्रात सहभागी होऊ शकणार आहे.
विशेष बाब म्हणजे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रत्येक नोंदणीकृत सहभागीचे डिव्हाईस अधिकृतरीत्या नोंदविले जाणार असून सहभागाची अचूक गणना केली जाणार आहे. त्यामुळे या विक्रम प्रयत्नामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारताच्या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हा
दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 6.15 ते 7.35 या वेळेत होणाऱ्या युट्यूब लाईव्ह योग सत्रात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन भारताच्या या ऐतिहासिक उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.
योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देतानाच जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या या राष्ट्रीय प्रयत्नात प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे योगाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन जगाला घडणार आहे.
“निरोगी भारत, सशक्त भारत” या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने