हट्टा येथे खंजीर हल्ल्यात तरुणाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हट्टा, ता. वसमत (जि. हिंगोली), दि. १ जून २०२६ : हट्टा येथील आठवडी बाजार परिसरात झालेल्या जुन्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून तर दोन जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी हट्टा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास हट्टा येथील आठवडी बाजारातील खंडोबा मंदिरासमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. बसस्थानकाजवळ पूर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपींनी एकत्र येत प्रविण देशमुख, प्रदीप देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख यांच्यावर धारदार खंजीराने हल्ला केला.
या हल्ल्यात अनिरुद्ध देशमुख याच्या पोटात खंजीराने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला, तर प्रविण देशमुख आणि प्रदीप देशमुख हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादी पक्षाला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शुभम प्रसादराव देशमुख (वय ३१, व्यवसाय शेती, रा. हट्टा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून प्रणव भवर, पंकज भवर, प्रल्हाद भवर, उमेश भवर आणि योगेश भवर, सर्व रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९, ११८(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२ तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक युवराज गवळी यांनी हा गुन्हा नोंदविला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव करीत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, चार आरोपी सध्या परभणी येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, वैद्यकीय अहवाल (एमएलसी) आणि जबाब प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक हिंगोली, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत तसेच हट्टा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या गंभीर घटनेचा पुढील तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा