पाणी टाकताना विजेचा धक्का; महिलेचा दुर्दैवी मृत्यू
वसमत तालुक्यातील गुंडा येथील घटना; वाढत्या उकाड्यात कुलर वापरताना सावध राहण्याचे आवाहन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
02 जून 2026
प्रतिनिधी : हिंगोली. वसमत तालुक्यातील गुंडा येथे कुलरमध्ये पाणी टाकत असताना विजेचा धक्का लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१ जून) सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी मुंजाजी भालेराव (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर कुलरचा वापर करताना आवश्यक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून परिसरात तापमानात वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बहुतांश घरांमध्ये कुलरचा वापर सुरू आहे. गुंडा येथील अश्विनी भालेराव या आपल्या घरातील कुलरमधील पाणी संपल्याने त्यात पाणी भरत होत्या. यावेळी कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत अश्विनी भालेराव यांच्या मृतदेहाचे विच्छेदन हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सावधान! कुलर वापरताना घ्या ही काळजी
वाढत्या उष्णतेमुळे कुलरचा वापर वाढला असला तरी त्याची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. कुलरमध्ये पाणी भरताना किंवा स्वच्छता करताना विद्युत पुरवठा बंद करावा. वायरिंग, प्लग, स्विच व अर्थिंगची नियमित तपासणी करावी. ओल्या हातांनी कोणत्याही विद्युत उपकरणाला स्पर्श टाळावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
إرسال تعليق