पिंपरखेडचे प्रकाश वाढवे पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नत; वाढवे परिवारासह गावात आनंदाचे वातावरण
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 जून 2026
हिंगोली, प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यातील पिंपरखेड येथील सुपुत्र तथा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रकाश वाढवे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाल्याने त्यांच्या परिवारासह गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रकाश वाढवे यांची सन 1994 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली होती. सेवाकाळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यदक्षतेने काम करत अनेक उल्लेखनीय कामगिरी बजावल्या आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना आतापर्यंत 69 रिवार्ड्स (पुरस्कार) प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या प्रकाश वाढवे हे रायगड जिल्हा विशेष शाखा, खालापूर विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता आणि जनसेवाभिमुख कार्यामुळे पोलीस विभागात त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली. यामध्ये प्रकाश वाढवे यांच्या उत्कृष्ट सेवेला मान्यता देत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली. या निर्णयामुळे पोलीस विभागात तसेच त्यांच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, बाळा बाहडकर, मोहन भालेराव, शिवाजी ढुंदरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रकाश वाढवे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रकाश वाढवे यांच्या पदोन्नतीमुळे वाढवे परिवारामध्ये तसेच पिंपरखेड गावात आनंदाचे वातावरण असून, गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा