जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजामती मुटकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
19 जून 2026
हिंगोली / परभणी (प्रतिनिधी) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, गुरुवारी (दि. १८ जून) भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि त्यांच्या स्नुषा राजामती शिवाजीराव मुटकुळे यांनी परभणी येथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची नुकतीच घोषणा झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज आपले नशीब आजमावत आहेत. विद्यमान संचालक असलेले आ. तान्हाजी मुटकुळे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत राजामती मुटकुळे यांनीही अर्ज दाखल करत निवडणुकीत आपली उपस्थिती नोंदवली आहे.
या वेळी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, के. के. शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश थोरात, शिवाजीराव मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समर्थकांनी उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला.
अर्ज दाखल केल्यानंतर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तळागाळातील घटकांचा सर्वांगीण विकास साधणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
दरम्यान, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा