महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. सतीश देशमुख यांचा सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय
बंजारा समाजाच्या वतीने जंगी सत्कार
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
08जून 2026
हिंगोली : महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सतीश आबाराव देशमुख यांनी सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय संपादन केला आहे. तब्बल ९६०० मते मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
या निवडणुकीत राज्यभरातून शेकडो उमेदवार रिंगणात होते. एकूण १८ पुरुष व ५ महिला विधीज्ञ सदस्य पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या या लढतीत ॲड. देशमुख यांनी प्रभावी कामगिरी करत भरघोस मतांनी विजय मिळवला.
ॲड. सतीश देशमुख यांनी २०१० साली प्रथमच महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून निवडून येत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उपाध्यक्षपदासारखे प्रतिष्ठेचे पदही भूषवले आहे. त्यांच्या कार्यकाळात हिंगोली येथे पतसंस्था स्थापन करणे तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाच्या स्थापनेत त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला बंजारा समाजाचे नेते ॲड. संतोष भाऊ राठोड, ॲड. अविनाश राठोड, संदीप राठोड, ॲड. राज आडे, ॲड. शरद राठोड, विकास राठोड, भाऊ राठोड, प्रितम राठोड, रमेश राठोड, सुरभी प्रिंटचे प्रतिनिधी, सुरेश राठोड (सरपंच, चिंचोली), ज्ञानेश्वर चव्हाण, उल्हास चव्हाण, संतोष शंकर जाधव, रामराव फिरू राठोड, जीवन शेषराव आडे, संतोष पवार, अंबादास जाधव, रेणके सर, अर्जुन राठोड यांच्यासह बंजारा समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ॲड. देशमुख यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हिंगोली जिल्ह्याच्या विकासात तसेच विधी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
टिप्पणी पोस्ट करा