जिल्हा परिषदेत सर्व विभागांचा आढावा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सीईओ गायकवाड

जिल्हा परिषदेत सर्व विभागांचा आढावा; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
सीईओ गायकवाड 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, (दि. ८) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासकीय कामकाजाला गती देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यालयीन शिस्त याबाबत कडक निर्देश देण्यात आले.
बैठकीदरम्यान सीईओ विवेक गायकवाड यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. कार्यालयीन कामांमध्ये पारदर्शकता व गती आणण्यासाठी ‘ई-फाईल’ प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाकडून प्राप्त झालेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी ‘आयुष्यमान भारत कार्ड’ व ‘वय वंदना कार्ड’ वितरण मोहिमेला वेग देत पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यावर भर देण्यात आला. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील नागरिकांच्या तक्रारी विहित मुदतीत सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. ‘एकल महिला सक्षमीकरण’ योजनेचा आढावा घेण्यात आला, तर रस्ते डागडुगीकरणाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. तसेच ‘कर्मचारी समाधान शिबिरा’बाबतही माहिती घेण्यात आली.
आगामी तीन महिन्यांत जिल्हा १०० टक्के सोलरयुक्त करण्याचा मानस
या बैठकीत सीईओ विवेक गायकवाड यांनी पर्यावरणपूरक आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली. येत्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामपंचायती १०० टक्के सौरऊर्जेवर चालणाऱ्या करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शासकीय संस्था वीजबिलाच्या समस्येतून मुक्त होऊन स्वयंपूर्ण बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यालयीन शिस्तीबाबत शून्य सहनशीलता धोरण
कार्यालयीन शिस्तीचा भंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा विवेक गायकवाड यांनी दिला. सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असून, बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.
“यापुढे कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट व कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, उपशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशावरी काळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) विपुन भागवत, कृषी अधिकारी अतुल वायसे, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका राजपूत, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने